महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवणार : सभापती शिवांजली भोसले

भक्ती महिला सामाजिक व बहुउद्देशीय विकास संस्थेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण करण्यासाठी राबवण्यात येणारे विविध उपक्रम हे कौतुकास्पद आहेत. यातून महिलांच्या कलाकौशल्याचा विकास होईल आणि यातूनच कुटुंबालाही हातभार लागेल. असे प्रतिपादन पंचायत समितीच्या सभापती शिवांजली भोसले यांनी संस्थेच्या शिवणकाम कोर्स प्रमाणपत्र वितरण व गुणवंत नागरिक सत्कार समारंभात केले. त्या पुढे म्हणाल्या की, संस्था स्थापन होऊन दहा वर्षे पूर्ण झाली. संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी सौ.शैलाताई भाग्यवंत अविरत प्रयत्न करत असतात. त्यांच्या दर्जेदार शिक्षण देण्यामुळे अनेक महिलांनी याचा लाभ घेऊन त्या आपले स्वतंत्र व्यवसाय करीत आहेत. यामुळे साखरवाडी परिसरातील महिलांना आर्थिक विकासाची संधी मिळाली. संस्थेची उत्तरोत्तर प्रगती होवो अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. यावेळी वैष्णवी ब्युटी पार्लरचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री. तेजसिंग खानविलकर नाना उपस्थित होते. त्यांनीही संस्थेच्या कार्यास शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविकात संस्थेचे अध्यक्ष डॉ. आनंदा जाधव यांनी संस्था शिवणकाम वर्ग, वृक्षारोपण, शालेय विद्यार्थ्यांना मदत, गरजू महिलांना मदत, समाजातील गुणवंत व्यक्तींचा गुणगौरव कार्यक्रम राबवत असते. याचा उल्लेख केला. कार्यक्रमात सत्कारमूर्ती श्री . राजेंद्र पिसाळ यांनी मनोगत व्यक्त करताना, संस्थेच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. सामाजिक विकासासाठी संस्थेची कटिबध्दता कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.संस्थेच्या दशकपूर्ती सोहळ्याचा निमित्ताने श्री . रमेश कुचेकर सेवानिवृत्त शिक्षक, श्री.हिंदुराव नाचण सेवानिवृत्त शिक्षक,श्री. दशरथ साळुंखे सेवानिवृत्त आरोग्य अधिकारी, श्री. राजेंद्र पिसाळ आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक, छाया गर्जे-जगताप 
आदर्श महिला पुरस्कार सौ. शैला भाग्यवंत प्रशिक्षिका अशा समाजातील गुणवंत व्यक्तींचा सभापतींच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी शिवणकाम कोर्स पूर्ण केलेल्या पंचवीस महिलांना प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच गरजू महिलांना साडीचोळीचे वाटप करण्यात आले. तसेच इयत्ता दहावी मध्ये उज्ज्वल यश संपादन केल्याबद्दल आर्या राहुल बोंद्रे व भक्ती यशवंत भाग्यवंत यांचा सत्कार करण्यात आला. 
या कार्यक्रमास फलटण तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष कोंडके, साखरवाडी प्रा. आ. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रामेश्वर सोडमिसे, स्वागत गायकवाड, कांबळे सर, गजानन नवले, दयानंद महागाडे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन चौगुले यांनी केले तर आभार संस्थेचे सचिव यशवंत भाग्यवंत यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post