संविधानाच्या मूल्यांचा जागर; साखरवाडीत विद्यार्थ्यांची भव्य प्रभातफेरी अन् मानवी साखळी
साखरवाडी : सरदार वल्लभभाई हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, साखरवाडी किमान कौशल्य विभाग येथे गुरुवार, दि. २६ नोव्हेंबर २०२६ रोजी भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तिपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. प्रशालेचे प्राचार्य गोपाळराव जाधव व पर्यवेक्षिका सुनीता निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेच्या सामूहिक वाचनाने झाली. यामध्ये प्रशालेतील सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी मराठी विभागप्रमुख रवींद्र टिळेकर यांनी भारतीय संविधानाच्या निर्मितीचा गौरवशाली इतिहास विद्यार्थ्यांसमोर उलगडून सांगितला. तसेच भारतीय संविधानाच्या निर्मितीमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बजावलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाची माहिती देत विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व पटवून दिले.
सामाजिक एकता, बंधुता आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी विद्यार्थ्यांनी आकर्षक मानवी साखळी तयार केली. त्यानंतर विद्यार्थी, शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहभागातून साखरवाडीच्या बाजारपेठेतून भव्य प्रभातफेरी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी हातात संविधानविषयक विविध घोषवाक्यांचे फलक घेत भारतीय संविधानाचा जयघोष केला. या प्रभातफेरीमुळे संपूर्ण परिसरात देशभक्ती आणि संविधान जागृतीचे वातावरण निर्माण झाले.
संविधानविषयक ज्ञान व जागरूकता वाढविण्यासाठी प्रशालेच्या क्रीडा विभागातील जनार्दन पवार व नानासो तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये रांगोळी स्पर्धा व प्रश्नमंजुषा स्पर्धांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. विशेष आकर्षण ठरलेल्या सेल्फी पॉईंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संविधान दिनाच्या आठवणी जपण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली.
संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांची जाणीव विद्यार्थ्यांच्या मनात रुजविणे, त्यांच्यामध्ये संविधानाबद्दल आदर निर्माण करणे आणि राष्ट्रीय एकात्मता व देशप्रेमाची भावना दृढ करणे, हा या उपक्रमांचा मुख्य उद्देश होता. विविध उपक्रमांच्या माध्यमातून प्रशालेत संविधान दिन उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.
Tags
Sakharwadi