साखरवाडी : श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांच्या जयंतीनिमित्त सरदार वल्लभभाई हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, किमान कौशल्य विभाग, साखरवाडी येथे सोमवार, दि. २८ सप्टेंबर २०२६ रोजी विशेष व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना श्रीमंत मालोजीराजे यांच्या कार्याची आणि विचारांची ओळख करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे प्राचार्य गोपाळराव जाधव होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य जाधव यांनी प्रमुख पाहुणे व वक्ते प्रा. डॉ. अनिल टिके यांचे गुलाबपुष्प व शाल देऊन स्वागत केले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.
मराठी विभागप्रमुख रवींद्र टिळेकर यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला तसेच प्रमुख वक्ते प्रा. डॉ. अनिल टिके यांचा परिचय करून दिला.
यावेळी मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. अनिल टिके यांनी श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांचा जीवनपट सविस्तरपणे उलगडला. सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील त्यांचे उल्लेखनीय योगदान त्यांनी विद्यार्थ्यांना सोप्या व प्रभावी भाषेत समजावून सांगितले. त्यांच्या कार्यातून समाजसेवा, शिक्षणप्रेम आणि नेतृत्वगुण यांची प्रेरणा विद्यार्थ्यांनी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य गोपाळराव जाधव यांनी श्रीमंत मालोजीराजे यांच्या दानशूर वृत्तीची अनेक उदाहरणे सांगत त्यांच्या कार्याचा विद्यार्थ्यांनी आदर्श घ्यावा, असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमास पर्यवेक्षिका सुनीता निंबाळकर, किमान कौशल्य विभागाचे सतीश शिंदे, शिक्षक प्रतिनिधी महेश बावकर, तसेच प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र टिळेकर यांनी केले, तर महेश बावकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. उत्साहपूर्ण वातावरणात व्याख्यानमालेचा समारोप झाला.
Tags
Sakharwadi