प्लास्टिकमुक्त फलटण तालुका अभियानाची साखरवाडीतून सुरुवात

प्लास्टिकमुक्त फलटण तालुका अभियानाची साखरवाडीतून सुरुवात

विद्यार्थ्यांना प्लास्टिकच्या दुष्परिणामांची जाणीव; अनावश्यक प्लास्टिक संकलनाचे आवाहन

साखरवाडी, दि. ३१ : फलटण तालुका प्लास्टिकमुक्त करण्याच्या अभियानाची सुरुवात सरदार वल्लभभाई हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, किमान कौशल्य विभाग, साखरवाडी येथे उत्स्फूर्त वातावरणात झाली. फलटण एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली या अभियानाचे आयोजन करण्यात आले.

या अभियानाचा एक भाग म्हणून माजी प्राचार्य सुधीर इंगळे यांनी सोमवार, दि. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सरदार वल्लभभाई हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, साखरवाडी येथे भेट दिली. यावेळीप्रशालेचे प्राचार्य गोपाळराव जाधव यांनी पुष्पगुच्छ देऊन सुधीर इंगळे यांचे स्वागत केले. मराठी विभागप्रमुख रवींद्र टिळेकर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करून पाहुण्यांचा परिचय करून दिला.

यावेळी सुधीर इंगळे यांनी प्रभावी आणि विनोदी शैलीतील भाषणातून दैनंदिन जीवनातील प्लास्टिकचा अनावश्यक वापर, प्लास्टिकमुळे पर्यावरणावर होणारे गंभीर परिणाम तसेच मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्लास्टिकचा वापर कमी करण्यासोबतच घर, शाळा आणि परिसरात आढळणारे अनावश्यक प्लास्टिक संकलित करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

‘प्लास्टिकमुक्त फलटण’ हे केवळ अभियान न राहता प्रत्येक नागरिकाची जबाबदारी बनली पाहिजे, असा संदेश यावेळी देण्यात आला. विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही करण्यात आले.

कार्यक्रमास प्रशालेतील सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र टिळेकर यांनी केले, तर रघुनाथ शेळके यांनी उपस्थितांचे आभार मानले.

साखरवाडी येथून सुरू झालेल्या या उपक्रमामुळे प्लास्टिकमुक्त फलटण तालुका अभियानाला शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून व्यापक जनजागृतीची दिशा मिळाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post