फलटण प्रतिनिधी : शासनाच्या प्रस्तावानुसार मौजे साखरवाडी (पिंपळवाडी) येथे अप्पर तहसीलदार कार्यालयाचे मुख्यालय स्थापन करून फलटण तहसीलमधील होळ, तरडगाव व आदर्की बु. ही तीन मंडळे त्यास जोडण्याचा प्रस्ताव आहे. आळजापूर गाव हे आदर्की बु. मंडळामध्ये येत असल्याने या प्रस्तावानुसार गावाचा समावेश साखरवाडी अप्पर तहसील कार्यालयात होणार आहे.
मात्र, आळजापूर गावाचा शैक्षणिक, व्यापारी, प्रशासकीय तसेच रोजगाराच्या दृष्टीने फलटण शहराशी अनेक वर्षांपासून घनिष्ठ संबंध आहे. अशा परिस्थितीत आळजापूर गाव साखरवाडी अप्पर तहसील कार्यालयास जोडल्यास ग्रामस्थांची कायमस्वरूपी गैरसोय होणार आहे. साखरवाडी येथे जाण्यासाठी फलटणमार्गे प्रवास करावा लागणार असून त्यामुळे वेळ व पैशाचा अनावश्यक अपव्यय होईल. तसेच साखरवाडीसाठी कोणतेही थेट सार्वजनिक वाहतूक साधन उपलब्ध नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागेल.
या सर्व बाबींचा विचार करून आदर्की बु. मंडळ हे फलटण तहसील कार्यालयाशीच कायम ठेवण्यात यावे, अशी आळजापूर ग्रामस्थांची ठाम मागणी आहे.
यासंदर्भात दि. ७ जुलै २०२७ रोजी आळजापूर ग्रामस्थांनी ग्रामस्थांच्या सहीसह प्रांताधिकारी व तहसीलदार, फलटण यांना निवेदन सादर करून प्रस्तावित बदलास अधिकृत हरकत नोंदविली.
ग्रामस्थांच्या सोयीचा विचार करून शासनाने या प्रस्तावाचा फेरविचार करून आळजापूर गावास फलटण तहसीलशीच कायम जोडून ठेवावे, ही सर्व ग्रामस्थांची एकमुखी मागणी आहे.
Tags
Sakharwadi