लोकमतच्या व्यासपीठावर सुरवडीच्या सौ. शरयू साळुंखे-पाटील यांचा दिमाखदार गौरव


 साखरवाडी प्रतिनिधी  : 
फलटण तालुक्यातील सुरवडी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. शरयू साळुंखे-पाटील यांना ग्रामविकास क्षेत्रातील उल्लेखनीय, लोकाभिमुख व प्रेरणादायी कार्याबद्दल लोकमत समूहाच्या वतीने आयोजित विशेष गौरव सोहळ्यात सन्मानित करण्यात आले. फलटण तालुक्यातून एकमेव महिला सरपंच म्हणून त्यांना हा मानाचा पुरस्कार मिळाल्याने सुरवडी गावासह संपूर्ण तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

सातारा येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या दिमाखदार सोहळ्यात महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नामदार श्री. शंभूराजे देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. नामदार छत्रपती श्री. शिवेंद्रराजे भोसले तसेच सातारा जिल्हा परिषद अध्यक्षा मा. सौ. प्रिया ताई शिंदे यांच्या हस्ते सौ. शरयू साळुंखे-पाटील यांना पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.

लोकमत सरपंच अवॉर्ड २०२६ अंतर्गत सातारा जिल्ह्यातील विविध क्षेत्रांत उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या निवडक १३ सरपंचांचा गौरव करण्यात आला. त्यामध्ये ग्रामविकास, स्वच्छता अभियान, महिला सक्षमीकरण, पायाभूत सुविधा, पर्यावरणपूरक उपक्रम, लोकसहभागातून राबविण्यात आलेली विकासकामे तसेच नाविन्यपूर्ण योजनांची प्रभावी अंमलबजावणी या बाबींमध्ये विशेष कार्य करणाऱ्या सरपंचांचा समावेश होता. त्यामध्ये फलटण तालुक्यातून सौ. शरयू साळुंखे-पाटील यांनी मानाचा पुरस्कार पटकावत तालुक्याचे नाव उज्ज्वल केले.

या सोहळ्यावेळी उपस्थित मान्यवरांनीही सरपंचांच्या कार्याचे कौतुक करत ग्रामविकासासाठी अशाच लोकाभिमुख कामांची गरज असल्याचे मत व्यक्त केले. मा. श्री. शंभूराजे देसाई यांनी “गावाने आपला सरपंच निवडताना विचारपूर्वक निवड करावी” असे मत व्यक्त केले, तर मा. श्री. शिवेंद्रराजे भोसले यांनी “सरपंच हा गावाचा मुख्यमंत्री असून ग्रामविकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहावे” असे सांगितले. मा. सौ. प्रिया ताई शिंदे यांनी विविध विकास योजनांचा ग्रामस्थांना लाभ मिळवून देण्यासाठी सरपंचांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.

सुरवडी ग्रामपंचायतीने अल्पावधीतच गावामध्ये स्वच्छता, मूलभूत सुविधा, महिला सक्षमीकरण, लोकसहभागातून विकासकामे आणि सामाजिक उपक्रम राबवून तालुका व जिल्हास्तरावर वेगळी ओळख निर्माण केली आहे. ग्रामस्थांमधूनही सौ. शरयू साळुंखे-पाटील यांच्या कार्याबद्दल समाधान व अभिमान व्यक्त करण्यात येत आहे.

या गौरव सोहळ्यास लोकमत समूहाचे श्री. सचिन जावळकोटे, श्री. मकरंद देशमुख तसेच लोकमतची संपूर्ण टीम उपस्थित होती. त्यांच्या उपस्थितीत हा सोहळा अधिक दिमाखदार वातावरणात पार पडला.

ग्रामीण भागातील सकारात्मक, प्रेरणादायी व लोकाभिमुख कार्य समाजासमोर आणून अशा कर्तृत्ववान सरपंचांचा गौरव करण्याचा लोकमत समूहाचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असून, ग्रामीण विकासाला नवी दिशा व प्रेरणा देणारा ठरत आहे. सौ. शरयू साळुंखे-पाटील यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post