फलटण प्रतिनिधी : जीवनाच्या प्रत्येक वळणावरती माणूस नव्याने काहीतरी शिकत असतो. हे शिकणे त्याला त्याच्या ध्येयापर्यंत घेऊन जाते. ध्येय साध्य करण्यासाठी वाचन, मनन,चिंतन व आत्मपरिक्षणाची गरज आहे.स्पर्धेच्या युगात ठिकायचे असेल माणसे व पुस्तके वाचली पाहिजे. पुस्तके जगण्याची दिशा देतात तर माणसे जगायला शिकवतात.पुस्तक वाचनाने मस्तक सुधारते.सुधारलेले मस्तक कोणापुढे नतमस्तक होत नाही.त्यामुळे वाचनाला जीवनात फार महत्व आहे.वाचनाने माणसाच्या मनाची मशागत होते असे प्रमुख पाहुणे माणदेशी साहित्यिक व रयत सेवक ताराचंद्र आवळे यांनी गोखळी ता. फलटण येथे शाहिद भगतसिंग प्रतिष्ठान संचलित स्व. राजेंद्र तात्या भागवत सार्वजनिक वाचनालय व स्पर्धा परीक्षा केंद्र यांच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त 135 ग्रंथ भेट कार्यक्रमात मत व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य सौ.ऋतुजा जगताप, तंटामुक्ती अध्यक्ष मनोज गावडे यांची प्रमुख उपस्थिती होती. ताराचंद्र आवळे पुढे म्हणाले की आपली मुले ही आपली संपत्ती आहे त्यांना वाचनाची गोडी लावा वाचाल तर वाचाल हे नुसते म्हणून चालणार नाही तर आधुनिकतेचा बुरखा घेतलेल्या व सुधारलो आहे असे म्हणणाऱ्या या पिढीने मोबाईल बाजूला ठेवून जर पुस्तक हातामध्ये घेतले तर निश्चितच भावी पिढीला प्रेरणा मिळेल. मोबाईल मधील रिल्स मुळे माणसांचे आयुष्य हे क्षणाचे बनत चालले आहे. क्षणभंगुर आयुष्यामध्ये चांगले जीवन जगायचे असेल तर चांगली पुस्तके वाचा व जीवनास आकार घ्या. प्रत्येक घरातील माणसांनी ठरवले व वाचनाची गोडी लावून घेतली तर समाज बदलायला वेळ लागणार नाही यासाठी इच्छाशक्तीची गरज आहे. आपली मुले कोणाची शिकार होणार नाहीत याची काळजी घ्या व त्यांना योग्य वयात योग्य संस्कार देऊन घडवा. बिघडवणारी अनेक भेटतील पण घडवणारी मोजकीच आहेत आपण कोणत्या बाजूने राहायचे हे ज्याचे त्याने ठरवले पाहिजे. आजची सामाजिक व राजकीय परिस्थिती पाहता काहीच ताळमेळ दिसून येत नाही त्यामुळे कुटुंब जपा व जीवनास आकार घ्या. यावेळी सामाजिक कार्यकर्ते आबा मदने यांनी वाचनाचे महत्त्व समजावून सांगितले.शाहीर प्रमोद जगताप,सामाजिक कार्यकर्ते सतीश झेंडे यांनी समाज प्रबोधन पर कविता सादर करून मनोगत व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीचे औचित्य साधूनमाणदेशी साहित्यिक, रयत सेवक ताराचंद्र आवळे यांनी स्व. राजेंद्र तात्या भागवत सार्वजनिक वाचनालय व स्पर्धा परीक्षा केंद्र यांना 135 पुस्तके भेट दिली. यामध्ये कथा, कादंबरी, कविता, चरित्र, आत्मचरित्र तसेच स्पर्धा परीक्षेस उपयुक्त अशा पुस्तकांचा समावेश आहे. यावेळी यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक योगेश भागवत यांनी केले तर सूत्रसंचालन राधेश्याम जाधव यांनी केले. यावेळी मा. सरपंच रमेश गावडे, अमोल हरिहर, बबलू शिरतोडे, मयूर गावडे, श्रीकांत माने तसेच स्पर्धा परीक्षेचे तयारी करणारे विद्यार्थी व ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. वाचनालयास पुस्तके भेट दिल्याबद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केले.
Tags
Sakharwadi