फलटण : मराठी साहित्य हे आज जगभर पोहोचलेले दिसते. यामध्ये संत पंथ थोर युगपुरुष साहित्यिक कवी लेखक यांचे फार मोठे योगदान आहे. मराठी भाषा ही साधी सरळ सोपी असून ती वापरायला अधिक दर्जेदार आहे या भाषेचा गोडवा इतर भाषेपेक्षा फार निराळा आहे त्यामुळे ही भाषा आज जगभर पोहोचलेली दिसत असून त्याचा विस्तार व वाढ करण्याचे काम आपणा सर्वांच्या आहे. मराठी भाषेतील साहित्यिक यांचे कार्य उत्तम असून त्यांचे साहित्य हे दिशादर्शक व प्रेरणादाय आहे त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण झाली पाहिजे असे मत फलटण येथील विधी महाविद्यालयाचे प्रा. श्रेयस कांबळे यांनी रयत शिक्षण संस्थेचे श्री जितोबा विद्यालय जिंती येथे मराठी भाषा गौरव दिन वि वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांची जयंती यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात मांडले. यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापिका जाधव एम. डी., ज्येष्ठ शिक्षक ताराचंद्र आवळे, विद्या जमदाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. श्रेयस कांबळे पुढे म्हणाले की छत्रपती शिवरायांनी मराठी भाषेतून राज्यकारभार सुरू करून एक समाजापुढे आदर्श निर्माण केला व मराठी भाषेचा विस्तार सुरू झाला. पुढे हीच मराठी भाषा वाढविण्यामध्ये अनेक थोर विभूतींनी आपले योगदान दिले आहे. चक्रधर स्वामी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज तसेच अनेक थोर संत यांनी मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी आपल्या वाणीने व लेखणीने मोठे योगदान दिले आहे. ही मराठी भाषा टिकविण्याची जबाबदारी आपणा सर्वांचे आहे त्यासाठी आपण सामूहिक प्रयत्न करूया. यावेळी ज्येष्ठ शिक्षक व माणदेशी साहित्यिक ताराचंद्र आवळे म्हणाले की मराठी भाषेवर अनेक आक्रमणे झाले अतिक्रमणे झाली तरी मराठी भाषा आजही जशीच्या तशी ताट मानेने उभी आहे. मराठी भाषा आपण टिकवली पाहिजे यासाठी दैनंदिन व्यवहारामध्ये मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे व इतर भाषेतील शब्द वापरणे टाळणे काळाची गरज आहे. थोर संत, छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज व साहित्यिकांनी दिलेल्या योगदानातून मराठी भाषेचा कणा ताठ आहे त्यामुळे ही भाषा आपली मातृभाषा म्हणून प्रत्येकाने आईप्रमाणे जपली पाहिजे मातृभाषा टिकली तरच आपल्या अस्तित्व टिकेल त्यामुळे माय मराठी ला आपण आपल्या दैनंदिन व्यवहारात आईचे स्थान दिले पाहिजे. यावेळी सौ जाधव एम.डी. उपशिक्षक गायकवाड ए. आय. तसेच विद्यार्थीनी तनया जगताप यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ सोनवलकर ए. ए. यांनी केले तर आभार कु. हन्नूरे एस.एम. यांनी मानले. यावेळी विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.
Tags
phaltan